प्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक

मुंबई प्रतिनिधी – शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमीनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

ग्रामपंचायत स्तरावर सुपिकता निर्देशांक फलक लावण्याबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, सह सचिव गणेश पाटील उपस्थित होते. दरवर्षी ५ डिसेंबरला जागतिक मृद दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिन साजरा करताना प्रत्येक गावात कार्यशाळा घ्यावी. त्यावेळी गावातील अन्नद्रव्यांचा सुपिकता निर्देशांक त्या गावातील जमीनीमध्ये असणारे घटक त्याला आवश्यक खत आणि त्याची मात्रा यासंदर्भात शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी माहिती द्यावी. त्याचबरोबर गावातील प्रमुख पिकांच्या मार्गदर्शनासाठी ग्रामपंचायतीमध्ये फलक लावावेत, असे आवाहनही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

राज्यात ३८,५०० गावांचे जमीन सुपिकता निर्देशांक तयार करण्यात आले असून ते कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. हे निर्देशांक प्रत्येक गावात मोठ्या फलकावर लावण्यात यावेत. हे सुपिकता निर्देशांक तयार करताना त्या त्या गावातील प्रमुख पाच पिकांचा त्यात खरीप ३ आणि रब्बी २ असा समावेश करण्यात यावे असे निर्देशही त्यांनी दिले.

३८ हजार ५०० गावांचे जमीन सुपिकता निर्देशांक तयार करताना ४ घटकांवर आधारित एका गावाचे बारा वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा विचार करण्यात आला आहे.

 

Protected Content