Home Cities अमळनेर वारसदारांच्या कर्जवाटपाचा प्रश्न मार्गी ; जळगाव जिल्हा बँकेचा मोठा दिलासा 

वारसदारांच्या कर्जवाटपाचा प्रश्न मार्गी ; जळगाव जिल्हा बँकेचा मोठा दिलासा 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज वाटपाच्या पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे निर्माण झालेला वारसदार शेतकऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने सामाईक कर्ज घेणाऱ्या वारसदारांना मोठा दिलासा मिळाला असून कर्जवाटपाची पूर्वीची पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चालू 2026 आर्थिक वर्षासाठी बँकेने प्रत्येक वारसदाराला स्वतंत्रपणे कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्याने शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी सामाईक खात्यातील सर्व वारसदारांनी एका व्यक्तीस अधिकृत करून दिलेल्या संमतीपत्राच्या आधारे कर्ज व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र, नवीन पद्धतीमुळे प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होण्याची तसेच कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांनी १८ एप्रिल रोजी बँकेचे चेअरमन यांच्याकडे निवेदन सादर करून वारसदारांच्या अडचणींचा मुद्दा ठामपणे मांडला. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, मात्र सर्व संबंधित बाजू ऐकून अखेरीस सकारात्मक तोडगा काढण्यात आला.

संचालक मंडळाने यापूर्वीप्रमाणेच संमतीपत्र धारक वारसदारांनाच कर्ज वाटप करण्याची पद्धत कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात पीक कर्ज वितरण पूर्ववत पद्धतीने होणार असून शेतकऱ्यांवरील अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे.

या बैठकीस चेअरमन संजय पवार, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार सतीश पाटील, प्रताप हरी पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रा. सुभाष पाटील, दिनेश पवार आणि रोहिदास सुखा पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदनही सादर करण्यात आले होते.

प्रा. सुभाष पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वारसदार शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी बँकेसमोर ठाम भूमिका मांडली. अखेर संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.”


Protected Content

Play sound