दुबई । मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पाच गड्यांनी पराभव करून यंदाचे विजेतेपद पटकावले आहे.
युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या खझङ स्पर्धेचा आज अंतिम सामना दुबईच्या मैदानावर खेळवला गेला. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार्या दिल्ली कॅपिटल्सला ट्रेंट बोल्टने सुरुवातीलाच दोन धक्के दिले. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉइनिसला बाद करत बोल्टने दिल्लीची अवस्था एका चेंडूत १ बाद शुन्य धावा अशी केली. त्यानंतर बोल्टनेच अजिंक्य रहाणेला अवघ्या २ धावांवर बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणार्या शिखर धवनने ३ चौकारांच्या मदतीने १५ धावा केल्या पण, जयंत यादवने त्यालाही बाद करत दिल्लीची अवस्था ३.३ षटकात ३ बाद २२ अशी केली.
या नंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ऋषभ पंतच्या साथीने भागिदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी दिल्लीला ९ षटकात ५९ धावांपर्यंत पोहतचवले. दरम्यान पाचव्या क्रमांकावर आलेल्या पंतने आक्रमक फलंदाजी करत पहिल्यादा अर्धशतक पूर्ण केले. पण, अर्धशतकानंतर पंत लगेचच बाद झाला. यानंतर अय्यरने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, त्याला दुसर्या बाजूने साथ देणारा हेटमायर अवघ्या ५ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याला दमदार गोलंदाजी करणार्या बोल्टने बाद केले. त्यामुळे दिल्लीची अवस्था १७.२ षटकात ५ बाद १३७ धावा अशी झाली होती. यामुळे दिल्लीची धावगती मंदावली. अखेर अय्यरने अखेर षटकार मारून संघाला २० षटकात ७ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारून दिली. अय्यरने ४७ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या.
दिल्लीने ठेवलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकने धडाकेबाज फलंदाजी करत या दोघांनी ४ षटकात ४५ धावांची सलामी दिली. पण, फलंदाजी करताना सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणार्या स्टॉइनिसने आपल्या पहिल्याच चेंडूवर २० धावा करणार्या डिकॉकला बाद केले. मात्र त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने आल्या आल्या आक्रमक फटके मारत दिल्लीवर दबाव वाढवला. रोहित शर्माने आपल्या पोतडीतून एक एक आक्रमक शॉट बाहेर काढत मुंबईला १० षटकात ९० धावांपर्यंत पोहचवले. कर्णधार रोहितने आपले अर्धशतक पूर्ण करुन घेतले. पण, त्यानंतर चुकीच्या कॉलमुळे सूर्यकुमार धावबाद झाला. त्याने रोहितसाठी आपली विकेट दिली. यानंतर इशान किशनने सुंदर फटकेबाजी करत सामना लगेचच मुंबई इंडियन्सच्या कवेत घेतला. पण, मुंबईला २४ चेंडूत विजयासाठी २० धावांची गरज असताना नॉर्खियाने कर्णधार रोहितला ६८ धावांवर बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. तर पोलाडदेखील लवकर परतला. मात्र यानंतर कोणतीही विकेट न जाता मुंबईने आयपीएलचे विजेतेपद पटकावले.