मुंबई प्रतिनिधी । आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. आज सकाळी ईडीचे पथक पी.चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी तिहार जेलमध्ये पोहोचले होते. जवळपास एक तास पी चिदंबरम यांची चौकशी करण्यात आली.
मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी तसेच अटक करण्याची परवानगी दिली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पी. चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत. यादरम्यान चिदंबरम यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आई नलिनसोबत पोहोचले होते. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसेच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकतं असेही सांगितले होते. विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी निर्णय सुनावताना सांगितलं होतं की, ‘मनी लॉण्ड्रिंग प्रकरणातील आरोपीविरोधात जर सबळ पुरावे असतील तर ईडी अटकेची कारवाई करु शकतं. यामध्ये न्यायालयाने मध्यस्थी करण्याची गरज नाही. पण आरोपी आधीच एखाद्या प्रकरणात अटकेत असेल तर चौकशीसाठी परवानगी घेणं गरजेचं आहे’. पुढे त्यांनी सांगितलं होतं की, ‘न्यायालयाच्या परवानगीसोबतच अशा चौकशीदरम्यान अटक करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर तसं केलं जाऊ शकतं’.