थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करा; चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणारी महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून वीजग्राहकांनी सहकार्य करावे. अन्यथा बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करावा. असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

मंगळवार, दि. २४ मे रोजी जळगाव येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात चंद्रकांत डांगे यांनी जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलाची आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार व नंदुरबार मंडलाचे अनिल बोरसे मंचावर उपस्थित होते.

यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक डांगे म्हणाले की,  ‘ना नफा, ना तोटा’ तत्वाने वीजसेवा देणाऱ्या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत करोडो रुपयांचे दायित्व आहे. दुसरीकडे महावितरणच्या वीजग्राहकांकडे थकबाकीचा मोठा डोंगर आहे. या गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणच्या अस्तित्वाचा सध्या बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. वीज ही मूलभूत गरज असतानाही ग्राहक इतर अनेक सेवांचे पैसे देतात. मात्र मूलभूत गरज असलेल्या विजेचे बिल भरत नाहीत.’ त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी दिले.

ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल अचूक व वेळेत देण्यासाठी मीटर एजन्सी नेमण्यात आलेल्या आहेत. या एजन्सींना मीटर रीडिंग घेताना फोटोंचा दर्जा सुधारण्यास व अचूक काम करण्यास सांगितले आहे. मात्र कार्यक्षमता न सुधारल्यास संबंधित मीटर रीडिंग एजन्सींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी विविध विषयाचा आढावा घेऊन या महिन्यात वीजबिल वसुलीसह ग्राहकसेवा आणखी गतिमानतेने करण्याचे आवाहन केले. बैठकीला जळगाव परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, जळगाव मंडलातील सर्व उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, अधिकारी व मीटर रीडिंग एजन्सीचे कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content