
अडावद (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निरोगी जीवनशैली, मानसिक शांतता आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देत अडावद येथील शामराव येसो महाजन विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळेत बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले. योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित आदर्श प्राथमिक शाळा व शामराव येसो महाजन विद्यालयाच्या प्रांगणात २१ जून रोजी सकाळी ७ वाजता योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगासोबतच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणेही तितकेच आवश्यक आहे. प्लास्टिकचा वापर कमी करून शाश्वत पर्याय स्वीकारणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी विद्यार्थ्यांना ‘क्लायमेट वॉरियर शपथ’चे महत्त्व समजावून सांगत पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करत सुदृढ आरोग्याचा मंत्र दिला.
योग शिक्षक एस. टी. महाजन आणि पी. आर. माळी यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाची सुरुवात वार्मअप आणि सूर्यनमस्काराने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ताडासन, त्रिटक ताडासन, वक्रासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, पादहस्तासन, वज्रासन, बालासन, पवनमुक्तासन, बद्धकोणासन, भुजंगासन, विरासन आणि शवासन आदी आसनांचा सराव केला. योगासनांनंतर विद्यार्थ्यांना भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम, बाह्य प्राणायाम, अनुलोम-विलोम प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम यांचे प्रशिक्षण देण्यात आले. शेवटी शांती मंत्र पठण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. नियमित योग केल्याने शरीराची क्षमता वाढते, मन एकाग्र होते आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, उपशिक्षक एन. ए. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी. एस. पवार, लिपिक सी. एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, कैलास महाजन तसेच आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. महाजन, आर. जे. महाजन, एस. टी. महाजन, वाय. एल. साळुंखे, डी. आर. वाघ, कामिनी चौधरी आणि पुनम सुतार यांनी परिश्रम घेतले.



