Home Cities जळगाव शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात रविवार, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा, लोकमत सखी मंच आणि आर्ट ऑफ लिव्हिंग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळी ७ ते ९ या वेळेत पार पडलेल्या या योग दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे होते. यावेळी सु. ग. देवकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा साळुंखे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक चंद्रशेखर पाटील, छाया पाटील, मंगेश जाधव, शाळेचे पर्यवेक्षक संजय वानखेडे आणि पर्यवेक्षिका रमा तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

योगशिक्षक चंद्रशेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नियमित योगसाधना ही निरोगी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते तसेच मनाची एकाग्रता, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक संतुलन वाढते. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योगशिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे योगासनांचा सराव करत योग दिनाचा संदेश आत्मसात केला.

मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणातून योगाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन केले. योगामुळे व्यक्तिमत्त्व विकासासोबतच अभ्यासातील एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ महाजन यांनी केले, तर सुनीता रोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. निरोगी जीवनशैलीचा संदेश देत शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात साजरा झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. योगाभ्यासातून आरोग्य, एकाग्रता आणि सकारात्मकतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


Protected Content

Play sound