फैजपूर (प्रतिनिधी) येथील धनाजी नाना महाविद्यालयात नुकतीच आंतर विभागीय धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात पार पडली. धनुर्विद्या ( महिला/पुरुष ) या खेळ प्रकारात एकुण 03 विभागांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी व उद्घाटक म्हणुन राजेश कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी राजेश कोल्हे यांनी खेळाडूंनी नियमीत सराव करुन विजय संपादन करता येतो असे सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी सर्व खेळाडूंना फैजपूर नगरीच्या आणि महाविद्यालयाच्या इतिहासाबद्दल माहिती सांगितली. तसेच खेळाडूंनी येथुन प्रेरणा घेऊन त्यांचे भविष्य उज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यासोबतच विद्यापीठ परिक्षेत्रातील कोणत्याही खेळाडूला आमच्या महाविद्यालयाचे द्वार खुले आहेत. आमच्याशी पत्र व्यवहार करुन येथे सरावाची परवानगी घेऊन सराव करु शकतात. यासाठी लागणारी सर्व मदत आमचे महाविद्यालय करायला तयार आहे. त्याकरीता ज्यास्तीत ज्यास्त खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा असे,देखील आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
धनुर्विद्या (पुरुष) जळगाव विभाग विजयी, नंदुरबार विभाग उपविजयी तर एरंडोल विभाग तिस-या स्थानी राहिले. तसेच धनुर्विद्या (महिला) क्रीडा प्रकारात जळगाव विभाग विजयी झाले.
स्पर्धेसाठी पंच म्हणुन प्रा. क्रांती वाघ तसेच निवड समिती चेअरमन प्रा.मुकेश पवार, निवड समिती सदस्य डॉ.भारत चाळसे व प्रा.विनीश चंद्रन हे होते. विभागीय स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक,संघ व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.डॉ.गोविंद मारतळे यांनी केले व आभार श्री.युवराज गाढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज गाढे, आर.डी.ठाकुर,रायमल भिलाला, कैलाश मेढे, किरण जोगी व प्रकाश भिरुड आदिंनी सहकार्य केले.