
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट पसरली असून जून महिन्याचा पंधरवडा उलटूनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून, याचा प्रचंड त्रास सर्वसामान्य नागरिकांसह लहान शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने, जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करून त्या सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना लेखी निवेदन सादर केले आहे. राज्यातील आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानाची भीषणता लक्षात घेता, प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी या निवेदनातून केली आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका प्रचंड प्रमाणात वाढला असून उष्ण वारे वाहत आहेत. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील लहान विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात किंवा दुपारच्या कडक उन्हात शाळेत ये-जा करावी लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे पायी किंवा सायकलने प्रवास करून शाळा गाठतात. या प्रखर उन्हामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे म्हणजेच निर्जलीकरण , कमालीचा अशक्तपणा आणि चक्कर येणे यांसारख्या गंभीर शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता ही सर्वात सर्वोच्च आणि महत्त्वाची बाब मानून जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करून सकाळच्या सत्रात वर्ग भरविण्याबाबत शिक्षण विभागाला आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याशिवाय, वाढत्या उष्णतेची तीव्रता पाहता प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, विद्यार्थ्यांना शाळा सुटताना किंवा भरताना सावली उपलब्ध करून दिली जावी, तसेच उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या कडक सूचना शिक्षण संस्थांना द्याव्यात, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या तत्परतेमुळे जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि नागरिकांमधून या मागणीचे स्वागत होत असून, प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



