‘ऊस तोड तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन’ – बहुजन मुक्ती पार्टीचा इशारा

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत मुक्ताई शुगर फॅक्टरी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ऊस तोडणी तात्काळ सुरू करावी असे न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन फॅक्टरीच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी देवरे यांना देण्यात आले.

संत मुक्ताई शुगर फॅक्टरी येथील कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करून ऊस लागवड करून घेतली. तसेच शेतकऱ्यांना तोंडी आश्वासन दिले होते की, बारा महिन्यात तुमच्या शेतातील ऊस तोडणी करण्यात येईल. परंतु १२ महिन्याच्यावर होऊनही शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडीला कारखाना प्रशासन सुरुवात करत नाही असे दिसून येत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून विज बिलांसाठी वीज तोडणी सुरू आहे. काही भागात उन्हाळा सुरू झाल्यामुळे बोरवेल आणि विहिरीचे पाणीसुद्धा कमी झालेले आहे. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाला पाणी देण्यास असमर्थ आहेत. शेतकर्‍यांना पुढील हंगामासाठी शेतजमिनी तयार करायचे आहेत. जर ऊसतोड लांबणीवर गेली तर जमिनी कधी तयार कराव्यात? पुढची पिके कशी घ्यावी ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

यामुळे ऊस लागवडी करणारे शेतकरी चिंतेत पडले आहेत. उन्हाळा असल्यामुळे अचानक उसाला आग लागून शेतातील ऊस जळून जाण्याची भीती सुद्धा शेतकऱ्यांना आहे. निसर्गाचेही काही सांगता येत नाही नैसर्गिक आपत्तीमुळे ही ऊस पिकाची नुकसान होण्याचे दाट शक्यता आहे ऊस तोड कामगार सुद्धा शेतकऱ्यांच्या ऊस तोडी साठी पैशाची अतिरिक्त मागणी करत आहे यामध्ये संत मुक्ताई शुगर फॅक्टरी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ऊस तोडणी तात्काळ सुरू करावी असे न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन संत मुक्ताई शुगर फॅक्टरी च्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी देवरे यांना देण्यात आले आहे.

माहितीस्तव प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, आमदार मुक्ताईनगर विधानसभा सदस्य या कार्यालयांना देण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे. विधानसभा प्रभारी राजू वानखेडे, एन एन टी एम तालुका अध्यक्ष शांताराम बेलदार, बी आय एन तालुकाध्यक्ष सिद्धार्थ हिरोळे, भारतीय बेरोजगार मोर्चाचे निलेश वानखेडे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे योगेश जाधव, राष्ट्रीय किसान मोर्चा सदस्य शेख बिस्मिल्ला शेख मज्जिद, किशोर प्रकाश कोल्हे, कवर सिंग नवल सिंग राठोड, अशोक खवले, पांडुरंग तांबे, सुनील चव्हाण, विशाल नारखेडे, कृष्णा नाफडे आदी. शेतकरी बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content