Home क्राईम इन्स्टाग्रामवरील बनावट प्रेमाचा सापळा ठरला जीवघेणा; गोळीबारात जखमी तरूणाचा मृत्यू !

इन्स्टाग्रामवरील बनावट प्रेमाचा सापळा ठरला जीवघेणा; गोळीबारात जखमी तरूणाचा मृत्यू !

0
इन्स्टाग्रामवरील बनावट प्रेमाचा सापळा ठरला जीवघेणा; गोळीबारात जखमी तरूणाचा मृत्यू !

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट खाते तयार करून तरुणाला भेटण्यासाठी बोलावले आणि त्याच्यावर लोखंडी सळईने हल्ला करत गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना वरणगाव येथे घडली होती. यात जखमी झालेल्या सरफराज सय्यद या मुक्ताईनगर येथील तरूणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

या संदर्भात वृत्त असे की, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता मुक्ताईनगर येथील काझीपुरा परिसरातील सरफराज सय्यद सकिर सय्यद (वय २४) याला इन्स्टाग्रामवरील एका तरुणीच्या नावाने तयार केलेल्या खात्यावरून मेसेज आणि कॉल करण्यात आले. त्याला वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. सरफराज ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर लोखंडी सळईने हल्ला चढवला. डोक्यावर सलग दोन वार करून त्याला खाली पाडण्यात आले, तसेच पायावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यानंतर एका आरोपीने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून सरफराजवर दोन राऊंड गोळीबार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवून भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०, रा. फेकरी, ता. भुसावळ) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७, रा. फेकरी, ता. भुसावळ) या दोघांना अटक केली होती. आधीच्या वादातून झालेला बदला घेण्यासाठी हे भयंकर कृत्य करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.

दरम्यान, या प्रकरणात जखमी झालेल्या सरफराज सय्यद या तरूणाला उपचारासाठी जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना आज सकाळी त्याचे निधन झाले. सरफराज हा घरातील कर्ता पुरूष असल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा वज्राघात झाला आहे.