प्रेरणादायी उपक्रम : दिव्यांग मुलांसाठी ‘सितारे जमीन पर’ सिनेमाचा खास शो !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग मुलांना आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ आणि इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. शुक्रवार, ४ जुलै रोजी आमिर खान प्रस्तुत ‘सितारे जमीन पर’ हा प्रेरणादायी सिनेमा खास दिव्यांग मुलांसाठी दाखवण्यात आला. या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि जीवन जगण्याची नवीन उमेद स्पष्टपणे दिसत होती.

सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या या दोन्ही संस्थांनी उडाण या संस्थेत शिकत असलेल्या दिव्यांग मुलांसाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. रुशील फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या उडान दिव्यांग केंद्रातील बालकांसाठी जळगाव येथील पीव्हीआर सिनेमागृहात ‘सितारे जमीन पर’ सिनेमाची तिकिट्स बुक करण्यात आली होती. या माध्यमातून मुलांना आनंदाची एक अनोखी मेजवानी मिळाली.

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थचे अध्यक्ष बिपीन पाटील, सचिव हितेंद्र धांडे, भरत कार्डीले, चंदन कोल्हे, सुचिता चौधरी, दीपक पाटील, सोहम खडके, निशांत पोरणी, महेश चौधरी, प्रशांत अग्रवाल हे उपस्थित होते. तसेच, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव इस्टच्या प्रेसिडेंट सिमरन पाटील, सेक्रेटरी रितू शर्मा, आयएसओ रिटा भल्ला, ट्रेझरर नेहल कोठारी, सुलभा लढा, डीपीसीसी पीडीसी संगीता घोडगावकर, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, ॲड. कीर्ती पाटील, पायल चांदीवाल आणि उडान संस्थेच्या संस्थापिका हर्षाली चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

सिनेमा पाहताना मुलांना खाऊ वाटपही करण्यात आले. सिनेमा बघण्याचा आनंद दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे समाधान आयोजकांना मिळाले.