प्रेरणादायी यश : ऐन परीक्षेच्या काळात डोळा गमावलेल्या रितेशने मिळविले ९२ टक्के!

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील साई नगरातील रहिवाशी रितेश गंभीर या तरुणाचा एका दुर्घटनेत ऐन परीक्षेच्या काळात एक डोळा निकामी झाला. तरुणाने या गंभीर समस्येच्या बाऊ न करता, हिम्मत न हरता मोठ्या जिद्दीने दहावीच्या परीक्षेला सामोरे गेला आणि ९२ टक्के मिळवीत मोठे यशही मिळविले. त्याच्या या उज्वल कामगिरीचे कौतुक होत आहे.

पारोळा शहरातील साई नगरातील रहिवाशी रितेश गंगाधर गंभीर हा इयत्ता दहावीत श्री बालाजी माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेत हुशार असलेल्या या विद्यार्थ्यांवर ऐन परीक्षेच्या काळात मोठे आरोग्य संकट ओढवले. खेळत असतांना त्याच्या एका डोळ्यात प्लास्टिक बादलीच्या तुटलेल्या एक भाग डोळ्यात रुतून जोरात ओढला गेला. या दुर्घटनेत डोळ्याचा पडद्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे एका डोळ्याची दृष्टी गेली. या संकटावर त्याने मात करीत एका डोळ्याच्या दृष्टीवर कठोर मेहनत घेत अभ्यास केला अन मोठ्या जिद्दीने त्याने त्यात घवघवीत यश ही मिळविले आहे.

त्याच्या या खडतर प्रवासात वडील गंगाधर गंभीर यांच्यासह कुटूंबियांनी भक्कम साथ दिली. डोळा गेला पण ‘जिद्द’ सोडली नाही. एका डोळ्याची दृष्टी गमावणे हा रितेश आणि त्याच्या कुटुंबासाठी एक आश्चर्यकारकपणे आव्हानात्मक आणि त्रासदायक काळ होता. या कर्दनकाळात ही त्याने जिद्द सोडली नाही. मोठी मेहनत घेत एका डोळ्यावर अभ्यास केला. काही दिवसांच्या औषधोपचारानंतर परीक्षेला सामोरे गेला. आव्हानात्मक स्तिथीत मिळविलेले घवघवीत यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Protected Content