भुसावळ प्रतिनिधी । वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरासाठी गठीत केलेल्या तज्ज्ञ पथकांमधील एक पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. पथकाने आज भुसावळ शहरात भेट देऊन कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र यात केवळ पाहणी आटोपून पथक मार्गस्थ झाले याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणार असल्याचे सांगितले.
जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग तीव्रतने वाढत आहे. देशातील अन्य राज्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने असे ५० जिल्हे निश्चित करुन तेथील आढावा, उपाययोजनांच्या दृष्टीने ५० पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी असलेल्या या पथकाने ‘फिल्ड व्हीजिट’ केली आहे. या पथकाने सकाळी ट्रामा केअर सेंटर आणि शिवदत्त नगरातील लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन तेथील क्वॉरंटन परिवारातील सदस्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी समिती सदस्य डॉ अनुपमा, डॉ श्रीकांत, यासह जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ जमादार, डॉ पांढरे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी संदीप चिंद्रावर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संगीता पांढरे आदी उपस्थित होते.