कोरोना उपचारातील बोगस औषधांचा देशभर पुरवठा

 

मुंबई  : वृत्तसंस्था । कोरोनाच्या उपचारात प्रभावीपणे वापरल्या जाणार्‍या औषधांसह फेविपिरावीर गोळ्यांच्या बनावट मालाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

 

कोरोना काळात अँटी-व्हायरल फेवीपिरावीर गोळ्यांसह इतर औषधांची मागणी जोरात होती. त्या काळात या व्यापाऱ्याने हिमाचल प्रदेशमध्ये बनावट फार्मा कंपनी तयार केली. खोटी कागदपत्र तयार करुन बोगस औषधांचा पुरवठा केला. लोकांच्या आयुष्याशी खेळत कोट्यवधींची कमाई करण्यात तो व्यस्त होता.

 

मुंबई पोलिसांनी अटक केलेला हा व्यापारी कोरोना काळात झालेल्या हजारो मृत्यूंसाठी अप्रत्यक्षरित्या जबाबदार आहे. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला सुदीप मुखर्जी हा केमिकल अभियंता असून व्यावसायिक आहे. त्याने कोरोना उपचारासाठी प्रभावीपणे वापरल्या जाणाऱ्या फेविपिरावीर गोळ्यांसह अनेक औषध बनवण्याचे बनावट कारखाने हिमाचल प्रदेशात तयार केले होते. तिथून हे बनावट औषध तयार करुन देशभरात पुरवले जात असल्याचे समोर आले आहे.

 

आरोपीने बनावट कंपनी, बनावट परवाना, बनावट वितरक आणि कोरोनावरील उपचारासाठी बनावट फेवीपिरावीर गोळ्या आणि इतर आवश्यक औषधे तयार केली. ही औषधं तो मुंबई, दिल्ली, राजस्थानसह देशभरात वेगवेगळ्या औषधांच्या दुकानात विक्री करत होता. एवढंच नव्हे तर ही बनावट औषधं आनलाईनसुद्धा विकली जात होती.

 

एक कन्साइनमेंट दक्षिण मुंबईच्या औषध बाजारपेठेतही पोहोचला होता. तेथून फेविपिरावीर गोळ्या, हायड्रोक्लोरोक्विनसह अनेक औषधे अनेक नामांकित रुग्णालयात पोहोचवण्यात आली. याची माहिती मिळताच अन्न आणि औषध विभागाने छापा टाकला. बनावट औषधांचा माल जप्त करण्यात आला. तेव्हापासून सुदीप मुखर्जींचा काळा व्यवसाय समोर आला.

 

मूळ फेवीपिरावीर गोळ्या, हायड्रोक्लोरोक्विन सारखी औषधे कोरोनाच्या उपचारादरम्यान एक प्रभावी औषध आहे. मध्यम स्तरावर संक्रमित रुग्ण या औषधांच्या डोसच्या वापरामुळे बरे होतात. म्हणूनच या प्रकरणात आरोपी सुदिप मुखर्जीने या औषधाच्या पुरवठ्याशी संबंधित संपूर्ण बनावट सेटअप तयार केले आणि त्याचा पुरवठा देशभर सुरु करून कोट्यावधी रुपये कमवले.

 

याबाबत जेव्हा एफडीएला समजले, तेव्हा त्यांनी बनावट औषधांचा पुरवठा मार्ग शोधून काढण्यास सुरुवात केली. उपनगरीय मुंबईतील तीन औषध विक्रेत्यांच्या गोदामांवर छापा टाकला आणि तेथून बनावट फेवीपिरावीर गोळ्या व इतर बनावट औषधं जप्त केली.

 

जप्त केलेली औषधींची खेप म्हणजे केवळ रासायनिक घटकांचे मिश्रण आहे. ज्याचा कोरोना उपचारात काही उपयोग नव्हता. महाराष्ट्र एफडीए आणि मुंबई पोलिसांच्या तपासणीनुसार आरोपी सुदीप मुखर्जी यांनी कोरोनाच्या नावावर फसवणुकीचा व्यवसाय चालवण्यासाठी हिमाचल प्रदेशात मेसर्स मॅक्स रिलीफ हेल्थकेअर नावाची कंपनी स्थापन केली, पण प्रत्यक्षात सदर कंपनी राज्यात अस्तित्वात नाही.

 

या कंपनीशी संबंधित तपासणी दरम्यान एफडीए आणि मुंबई पोलिसांना समजले की ही औषधे या कंपनीच्या दिल्ली नोएडा कार्यालयातून होलसेल विक्रेत्यांना पुरवली जातात. तिथून ही बनावट औषधं विक्रेत्यांमार्फत विकली जात होती. पण शेवटी सुदीप मुखर्जी याला अटक करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार सुदीप मुखर्जी हा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, ग्वाल्हेर, दिल्ली आणि पंजाबमध्येही बनावट औषधांचा व्यवसाय करत होता. या रॅकेटमध्ये अनेक जण सहभागी असल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

Protected Content