…आणि महावितरणचे कार्यकारी अभियंताच बनले वीज ऑपरेटर !

खामगाव-अमोल सराफ | सध्या सुरू असलेल्या वीज कर्मचार्‍यांच्या संपात विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष मैदानात उतरले असून येथील कार्यकारी अभियंत्यांनी चक्क वीज ऑपरेटरची भूमिका पार पाडली आहे.

काल मध्यमरात्रीपासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेला ७२ तासाच्या संपा ला सुरुवात झाली आहे. यातच अनेक ठिकाणी वीज पुरवठ्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. येथे मात्र स्वत: कार्यकारी अभियंता हे वीज ऑपरेटर म्हणून मैदानात उतरल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला.

आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास खामगाव येथील वीज तक्रार निवारण केंद्र क्रमांक एक मध्ये केबल फॉल्ट झाल्याने तब्बल पंधरा ते वीस हजार ग्राहकांना याचा फटका बसला. संप सुरू असल्याने कुणी कामावर हजर देखील नव्हते. कंत्राटी कामगार, अभियंते हे शंभर टक्के यामध्ये सहभागी झाल्याने खामगाव येथील कार्यकारी अभियंता अजीतपाल सिंग दिनोरे यांनी स्वतःकडे सूत्र घेत. फक्त चार ते पाच तासांमध्ये काही तांत्रिक बाह्य स्रोत यंत्रणा घेऊन खामगावकरांना दिलासा दिला. यात ते स्वत: वीज ऑपरेटर बनले हे विशेष !

अधिकारी आणि त्यातील कार्यकारी अभियंता म्हटला म्हणजे फक्त लॅपटॉप आणि मोबाईल वर कामकाज करणारा व्यक्ती समोर येतो. पण जेव्हा शहराला सुरळीत वीज पुरवठा देण्याची वेळ येते .तेव्हा खुद्द दिनोरे यांनी सर्व रोल करत, खामगावकरांना गुड मॉर्निंग म्हटलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: