फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथील जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम संपन्न झाला. संस्थेतील प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांशी सुसंवाद निर्माण व्हावा, त्यांना शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेता यावे, हा या उपक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमात संस्थांतील सोयीसुविधा, अभियांत्रिकीच्या विविध शाखा, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, व्यक्तिमत्त्व विकास, योगा प्राणायामचे महत्व व प्रात्यक्षिक, संगणकीय सुविधा, त्यांचे महत्त्व, विविध अभ्यासक्रम, पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच्या करिअर संधी, यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाने आयोजित केला. कार्यक्रमास नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आधी कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ.के.जी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उदघाटनप्रसंगी व्यासपिठावर डॉ. आर.डी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, डॉ. पी.एम.महाजन, विभागप्रमुख डॉ. डी. ए. वारके, प्रा.डी.आर. पाचपांडे, प्रा.ओ.के.फिरके, प्रा.मोहिनी चौधरी उपस्थित होते. सर्वप्रथम प्रा.सेजल पाटील यांनी प्रस्तावना सादर केली. या वेळी सतत उत्साह बाळगून, जिद्द आणि चिकाटीने अभ्यासातच नव्हे तर महाविद्यालयातील इतर को-करिक्युलर आणि एक्सट्रा-करिक्युलर मध्ये विकास कसा करता येईल जेणे करुन उत्तमोत्तर कामगिरी करता येईल हे सांगितले.
प्राचार्य डॉ.के.जी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेसेंटेशन मध्ये सुरवातीपासून ते आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा आलेख सांगितला पुढे त्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक डिपार्टमेंट्स, लॅबोरेटोरीज व त्यामध्ये उपलब्ध असलेले सर्व अत्याधुनिक उपकरणे व सुविधा यांची माहिती दिली. सर्व विभाग प्रमुख व त्या-त्या विभागातील शिक्षक यांची ओळख करून दिली. नवीन शैक्षणिक प्रणालीनुसार प्रथम वर्ष बी. टेक चा नवीन अभ्यासक्रम (syllabus) व परीक्षा पद्धती तपशीलवार स्वरूपाने समजावून सांगितली.
त्यानंतर इंडक्शन प्रोग्रामच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.पी.एम.महाजन यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तसेच प्रवेश परीक्षेत चांगलं यश मिळवण्यासाठी विविध टिप्स व मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षापासूनच परिसर मुलाखतींमध्ये यश मिळवण्यासाठी लागणारे सर्व स्किल्स कसे व केव्हा आत्मसात करावे याविषयी माहिती उपप्राचार्य डॉ जी ई.चौधरी यांनी दिली. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या अंतिम सत्रात प्राचार्य डॉ.के.जी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे महत्त्व व दैनंदिन जीवनात या भाषेचा किती वापर होतो यावरती सविस्तर व्याख्यान दिले.
दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात यावल तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळवण्यासोबत जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात कथाकथनकार प्रा.व.पु.होले सरांनी विद्यार्थ्यांना माझी जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात व समाजात वावरताना आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे असे सांगितले. अंतिम सत्रात विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण विकसित करून ध्येयनिश्चिती करावी या विषयावर धनाजी नाना महाविद्यालयातील प्रा. कॅप्टन डॉ.आर आर राजपूत यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक स्वाती गवई यांनी विद्यार्थ्यांना तणाव मुक्त यश संपादन करण्यासाठी योगा प्राणायाम याचे महत्त्व विशद करून प्राणायाम याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून घेतले. यानंतरच्या सत्रात महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी तसेच श्री.श्री.सोलर सिस्टीमचे मुख्य प्रवर्तक तुषार महाजन यांनी विद्यार्थ्यांना अपरंपरागत ऊर्जा संसाधनांचे महत्व सांगितले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी चे विभाग प्रमुख प्रा.वाय.आर.भोळे, प्रा.व्ही.व्ही.महाजन, प्रा.एम.डी. पाटील, प्रा सेजल पाटील यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन,उपाध्यक्ष उल्हास शेठ चौधरी व मार्तंड भिरूड, सचिव विजय झोपे तसेच डॉ आर डी पाटील,प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई चौधरी व सर्व विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला.