नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । हमास आणि इस्रायल या दोघामध्ये युध्द सुरू असताना भारतीय कामागारांची एक तुकडी २ एप्रिल रोजी इस्रायलला रवाना झाली आहे. या तुकडीत ६० भारतीय आहेत. इस्रायलने मागच्यावर्षी भारत आणि अन्य देशातून हजारो श्रमिकांची भरती करण्याची घोषणा केली होती. हमास बरोबर युद्ध सुरु असल्याने इस्रायलने हजारो पॅलेस्टिनी कामगारांवर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये कामगारांची कमतरता निर्माण झाली आहे. जी२जी करारातंर्गत इस्रायलला जाणाऱ्या ६० पेक्षा जास्त भारतीय कंस्ट्रक्शन वर्कर्ससाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये भारत आणि इस्रायलमध्ये गवर्नमेंट टू गवर्नमेंट जी२जी करार झाला होता.
भारतीय श्रमिक इस्रायलला जाऊन दगडी बांधकाम, सूतारकाम, टायलिंग आणि बार-बेंडिंगची काम करणार आहे. फ्रेमवर्क वर्कर आणि बार-वेंडर्ससाठी प्रत्येकी तीन-तीन हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्या शिवाय टाइलिंग आणि प्लेटिंगसाठी दोन हजार नोकऱ्या आहेत. त्यांना महिन्याला एक लाख 37 हजारपेक्षा जास्त वेतन मिळेल. एनएसडीसी इंडिया ही कंपनी कामगारांना प्रशिक्षण देते. ही पब्लिक-प्रायवेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडल अंतर्गत वित्त मंत्रालयाने स्थापन केलेली एक सार्वजनिक लिमिटेड कंपनी आहे. मागच्या काही महिन्यात एनएसडीसी आणि इस्रायली कंपनीने हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेकडो कामगारांची परीक्षा घेतली होती.