कोलकाता वृत्तसंस्था । बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाचे कोलकाता येथे आगमन झाले आहे. यावेळी भारतीय संघाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. येत्या दि.२२ नोव्हेंबरपासून दोघं संघांचा पहिलाच डे-नाईट कसोटी सामना रंगणार आहे.
भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघाला कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळायचा आहे. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि १३० धावांनी धूळ चारली. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ कोलकातामध्ये दाखल झाला. कसोटी मालिकेतील पहिला सामना लवकर संपला होता. त्यामुळे आधी भारतीय संघाने गुलाबी चेंडूने सराव केला. दरम्यान, भारत-बांगलादेश प्रकाशझोतातील ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी कोलकाता शहर गुलाबी रंगात न्हाऊन निघाले आहे. कोलकातातील रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत सगळीकडे गुलाबी वातावरण पाहायला मिळत आहे. या सामन्याद्वारे बंगाल क्रिकेट असोसिएशन चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी गमावत नसून संघटनेच्या मुख्य कार्यालयावरसुद्धा गुलाबी छटा उमटली आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या कसोटीसाठी खास गुलाबी रंगातच बोधचिन्ह बनवण्यात आले असून त्याला ‘पिंकू’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मंगळवारी या पिंकूसह ट्विटरवर छायाचित्र पोस्ट केले होते. सामन्याच्या सर्व दिवशी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारावर चाहत्यांचे स्वागत करण्याबरोबरच सामन्यादरम्यानही हा पिंकू चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.
पहिले चार दिवस हाऊसफुल्ल
कोलकाता कसोटीच्या पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. जवळपास ६८ हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या ईडन गार्ड्न्सवरील या कसोटीसाठी चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे बांगलादेशने कडवी झुंज दिल्यास चाहत्यांना एका रोमहर्षक सामन्याचा अनुभव मिळू शकतो.