भारताचा सहा गडी राखून विजय

हैदराबाद वृत्तसंस्था । केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनीच्या दमदार फलंदाजीच्या बळावर आज भारताने पाहुण्या कांगारू संघावर सहा गडी राखून विजय संपादन केला.

भारताने ऑस्ट्रेलियाविरूध्द टि-२० मालिकेतील दोन्ही सामने गमावले असल्यामुळे पाहुण्या संघाचा आत्मविश्‍वास उंचावला होता. तथापि, पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताने कांगारूंना धुळ चारली.

पहिल्या वन-डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार फिंच शून्यावरच जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देत माघारी परतला. यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि उस्मान ख्वाजा यांनी दुसर्‍या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारीही झाली. मात्र केदार जाधवने स्टॉयनिसला माघारी धाडले. यानंतर उस्मान ख्वाजाने आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तंबू गाठला. ऑस्ट्रेलियाचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात २३६ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. तर केदार जाधवने एक बळी घेतला. २३७ धावांचा पाठलाग करत असताना भारताच्या डावाची सुरुवातही अडखळत झाली होती. सलामीवीर शिखर धवन भोपळाही न फोडता माघारी परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी-केदार जाधव यांच्यात झालेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने विजय संपादन केला. केदार जाधवने नाबाद ८१ तर धोनीने नाबाद ५९ धावांची खेळी केली.

Add Comment

Protected Content