मुंबई प्रतिनिधी । रोहीत, के.एल. राहूल व विराट कोहलीच्या वादळी फलंदाजीच्या बळावर भारतानं विंडीजचा ६७ धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.
विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहूल यांनी तूफान फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी ११.४ षटकांत १३५ धावा केल्या. केसरिक विलियम्सने रोहित शर्माला झेलबाद करत ही जोडी फोडली. रोहितने ३४ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारासह ७१ धावा केल्या. रिषभ पंत पुन्हा अपयशी ठरला, तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि राहुलने आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी तिसर्या विकेटसाठी ९५ धावा जोडत संघाची धावसंख्या २०० पार नेली. त्यानंतर शेल्डन कॉटरेलने राहुलला बाद करत ही जोडी फोडली. राहुलच शतक ९ धावांने हुकले, त्याने ५६ चेंडूत ९ चौकार व ४ षटकारासह ९१ धावा केल्या. तर विराटने २९ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारासह ७० धावा करत संघाची धावसंख्या २० षटकांत २४० पर्यत नेली.
विजयासाठी २४१ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजच्या संघाला २० षटकांत ८ बाद १७३ पर्यंतच मजल मारता आली. वेस्टइंडिजकडून फलंदाजीत कायरन पोलार्डने ३९ चेंडूत ६८ तर शिमरन हेटमायरने २४ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त विडींजच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि विंडीजला पराभवाला सामोरे जाव लागलं. भारताकडून गोलंदाजीत दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ गडी बाद करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.