चीनपाठोपाठ भारतही युद्ध क्षमतेचे प्रदर्शन करणार !

indian army

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | चीनने आपल्या सैन्य ताकतीचे प्रदर्शन केल्यानंतर आता भारत अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपच्या डोंगराळ भागातील युद्ध क्षमतेची चाचपणी करणार आहे. चीनने त्यांच्या ७० व्या वार्षिक परेड दरम्यान बॉम्बर, फायटर जेट, सुपरसॉनिक ड्रोन आणि डाँगफेंग-४१ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ताकत दाखवून दिली.

 

चीनला लागून असलेल्या नियंत्रण रेषेपासून काही अंतरावर ‘हिम विजय’ युद्धसरावाची तयारी सुरु आहे. ‘हिम विजय’मधून १७ व्या ब्रह्मास्त्र कॉर्प्सला शत्रूवर सफाईदारपणे हल्ला करण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. १७ कॉर्प्समधून तीन आयबीजी वेगळे काढण्यात येणार असून प्रत्येक आयबीजीमध्ये पाच हजार सैनिक आहेत.

रणगाडा, तोफखाना, हवाई सुरक्षा युनिट हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर, सी-१३० जे सुपर हरक्युलस आणि एएन-३२ युद्धसरावात सहभागी होणार आहेत. महिना अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी-जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यावेळी हिम विजय युद्धसराव जोरात सुरु असेल.

भारत आणि चीनमध्ये अधून-मधून सीमाप्रश्नावरुन वाद निर्माण होत असतात. दोन वर्षांपूर्वी डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते. त्यावेळी चीनने युद्धाचे इशारे दिले, पण भारतीय सैन्य एक इंचही मागे हटले नाही. अखेर ७० दिवसांनंतर राजनैतिक तोडगा निघाला आणि दोन्ही देशांचे सैन्य माघारी फिरले होते.

Protected Content