दुबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव २५१ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना नियमित अंतराने झटके दिले. ११ व्या षटकात कुलदीप यादवने रचिन रवींद्रला बाद करत पहिला धक्का दिला. रचिनने २९ चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने २० व्या षटकात १०० धावांचा टप्पा पार केला.
डॅरिल मिशेल आणि टॉम लॅथम यांनी संघाला सावरत १०० धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, २४ व्या षटकात टॉम लॅथम (१४) रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. यानंतर न्यूझीलंडने ३५ व्या षटकात १५० धावांचा टप्पा ओलांडला. पण, भारतीय क्षेत्ररक्षकांनी काही झेल सोडल्याने न्यूझीलंडला संधी मिळाली.
न्यूझीलंडचा डाव सुरळीत सुरू असताना ३८ व्या षटकात ग्लेन फिलिप्स (३४) वरुण चक्रवर्तीने त्रिफळाचीत केला. यामुळे अर्धशतकी भागीदारी तुटली. त्यानंतर विल यंगलाही वरुणने माघारी धाडले. मधल्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी प्रभाव टाकला. ११व्या ते ४०व्या षटकात न्यूझीलंडने ४ विकेट्स गमावल्या आणि १०३ धावा केल्या. यात कुलदीप यादवने २, तर जडेजा आणि वरुणने प्रत्येकी एक गडी बाद केला.
४२ व्या षटकात डॅरिल मिशेलने ९१ चेंडूत अर्धशतक साजरे केले. ही त्याची ८ वी अर्धशतकी खेळी ठरली. ४५ व्या षटकात न्यूझीलंडने २०० धावा पार केल्या. मात्र, ४६ व्या षटकात मिशेल (६३) शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माकडे झेलबाद झाला. यानंतर कोहलीच्या थ्रोवर ४९ व्या षटकात मिचेल सँटनर धावबाद झाला. शेवटी, न्यूझीलंडचा डाव २५१ धावांवर आटोपला आणि आता भारताला विजेतेपदासाठी २५२ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. भारतीय संघ हा सामना सहज जिंकतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.