मँचेस्टर वृत्तसंस्था । येथे झालेल्या विश्वचषकातील एक दिवसीय सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत आपली विजयी वाटचाल कायम राखली आहे. १४० धावांची शानदार खेळी करणार्या रोहितला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारत व पाकिस्तानमधील सामना हा नेहमी अतिशय चुरशीचा खेळला जातो. विश्वचषकाचा विचार केला तर आजवर भारताने सर्व सामने जिंकले आहेत. या पार्श्वभूमिवर, मँचेस्टर येथील सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रीत केले. मात्र त्यांचा हा निर्णय साफ चुकला. रोहीत शर्माने जोरदार टोलेबाजी करून पाकच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केली. त्याला के.एल. राहूलने समर्थ साथ दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी तब्बल १३६ धावांची भागिदारी केली. राहूल अर्धशतक केल्यानंतर बाद झाल्यावर विराटसह रोहितने फटकेबाजी सुरूच ठेवली. यामुळे ५० षटकांमध्ये भारताने पाच गड्यांच्या बदल्यात ३३५ धावांचे विराट लक्ष ठेवले.
मोठे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या पाकची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. इमाम उल-हकला विजय शंकरने आपल्या पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. यानंतर सलामीवीर फखार झमान आणि बाबर आझम यांनी दुसर्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. ही जोडी मोठी धावसंख्या उभारणार असल्याचे वाटत असतांनाच कुलदीप यादवने बाबर आझमचा त्रिफळा उडविला. यानंतर फखार झमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक हे फलंदाज ठारावीक अंतराने बाद झाले. मधल्या फळीत कर्णधार सरफराज आणि इमाद वासिम यांनी पाकच्या आशा जिवंत ठेवल्या. विजय शंकरने सरफराजला बाद केले. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकला ४० षटकांमध्ये ३०० धावा करायच्या होत्या. तथापि, हे आव्हान त्यांना पूर्ण करता आले नाही. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.