मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले आहे, असा पंतप्रधान देशात आजपर्यंत झाला नाही, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे.
हॅाटेल ग्रॅंड हयात येथे इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मल्लीकार्जून खर्गे बोलत होते, ते पुढे म्हणाले की, देशातली जनता भाजपाच्या कारनाम्यांवर, तोडफोड नितीवर नाराज आहे. भाजपाच्या तोडफोड नितीविरोधात व अत्याचारी कारभाराविरोघात इंडिया आघाडी लढत आहे. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकूल आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी ४६ जागा मिळतील व देशात सरकार स्थापन करु अशा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस पक्षाने ५ न्याय २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, महालक्ष्मी योजने अंतर्गत गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये, २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, शेतीवरचा जीएसटी हटवणार, कर्जमाफी देणार, जीएसटी बदलून नवीन सरळ जीएसटी आणणार ज्याचा एकच दर असणार. युपीए सरकारने आणलेल्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार गरिब लोकांना महिन्याला १० किलो धान्य मोफत दिले जाईल, असेही खर्गे म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आली तर अयोध्यातील राम मंदिरावर बुलडोझर चालवतील हा मोदींचा आरोप जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बुलडोझर संस्कृती भाजपाची आहे काँग्रेसची नाही आणि काँग्रेस असे काहीही करणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १० किलो मोफत धान्य देण्याची योजना ही नरेंद्र मोदींच्या योजनेवरून घेतली आहे यात तथ्य नाही. डॉ. मनमोहनसिंह सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणला व त्या अंतर्गत ही योजना आहे. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून गहू उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. युपीए सरकारनेच ही योजना आणली होती असे पवार यांनी स्पष्ट केले. एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, निवडणुकीत सावरकर हा मुद्दा नाही त्यावर राहुल गांधी कशाला काय बोलतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी विनाकारण चिथावणी देण्याचे काम करत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा काही दिवसापूर्वी म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहिल. आता त्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झाला आहे आता त्यांना आरएसएसची गरज नाही. म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिला त्या संघाला भाजपा नष्ट करायला निघाला आहे. आरएसएसला १०० वे वर्ष धोक्याचे असून भाजपा आरएसएसलाही नकली संघ म्हणू शकतो, आरएसएसवर बंदीही घालू शकतो असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करुन बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजपा करत आहे. नरेंद्र मोदी यांना अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव आठवत असेल, मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी त्यांची अवस्था आहे. भाजपाने १० वर्ष महाराष्ट्राला बदनाम केले. मुंबईची लुट करून गुजरातला घेऊन गेले आता इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे. ४ जूनला देशातील जुमलापर्व संपणार असून अच्छे दिन ची सुरुवात होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी खासदार हुसेन दलवाई, आशिष दुआ, बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा आदी उपस्थित होते.