पाचोरा प्रतिनिधी । शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच अनेक परिसरातील भागामध्ये मोकाट गुरांचा वावर अधिक वाढला आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्व सामान्यांसह एकता ऑटो रिक्षा चालक – मालक युनियनतर्फे करण्यात आली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा वावर वाढला असुन या मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच ही मोकाट गुरे मुख्य रस्त्यांवर कळपाने उभे राहत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मोकाट गुरांच्या रस्त्यांवरील वावरामुळे नियमित किरकोळ अपघात सुद्धा होत असतात. नगरपालिकेने या बाबी कडे गांभीर्याने लक्ष देवुन शहरात फिरत असलेल्या मोकाट गुरांच्या मालकांचा शोध घेवुन त्यांचे सुपुर्द करावे. अथवा त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त करुन त्यांचे मालकांना त्याबाबत सुचना द्यावी. अशी मागणी सर्व सामान्यांसह एकता अॅटो रिक्षा चालक – मालक युनियनतर्फे करण्यात आली आहे.