मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही महिन्यांत केळीचे बाजारभाव घसरले होते. मात्र, कुंभमेळा आणि आखाती देशांमधील वाढत्या मागणीमुळे केळीच्या किमतींना मोठी उसळी मिळाली आहे. मागील महिन्यात ८०० रुपये प्रतिक्विंटल असलेले केळीचे भाव आता थेट २१०० ते २२०० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात जळगावनंतर नांदेड जिल्ह्यातील केळीला सर्वाधिक मागणी असते. सध्या उत्तर महाराष्ट्रात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. जळगाव, अकलूज तसेच आंध्र प्रदेशातील केळीला २५०० ते ३ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.

सोलापूर येथून आखाती देशात निर्यात होणाऱ्या केळीला तब्बल ३ हजार रुपये भाव मिळत आहे, तर नांदेड येथील केळीचे दर २१०० ते २२०० रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, बाजारात आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने केळी सहज उपलब्ध होत नाहीत. दरवर्षी सुमारे १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. विशेषतः अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादन होते. आगामी महाशिवरात्रीला केळीच्या मागणीत आणखी वाढ होऊन भाव अधिक वाढतील, असे व्यापारी लक्ष्मणराव दुधाटे यांनी सांगितले. सध्या नांदेडच्या बाजारात प्रतिदिन केवळ १० गाड्यांचे लोडिंग सुरू असून, याआधी हंगामाच्या वेळी २०० ते २५० गाड्या भरल्या जात होत्या.
कुंभमेळा आणि आखाती देशांत मागणी वाढलीप्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामुळे विविध फळांसह केळीची मागणी प्रचंड वाढली आहे. तसेच, आखाती देशांतही नांदेड आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात केली जात आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत केळी सहज उपलब्ध होत नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. केळीच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी काही आठवड्यांत आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.