प्रयागराज-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मौनी अमावस्येनिमित्त झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. बुधवारी लाखो भाविक संगम स्नानासाठी जमले असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. महाकुंभाचे उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांनी बॅरिकेड्स ढकलून पवित्र पाण्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाली.

प्रशासनाने घेतले पाच मोठे निर्णय
महाकुंभ मेळा परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही विशेष पासमधून वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांची वर्दळ सुरळीत करण्यासाठी एकतर्फी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. गर्दी कमी करण्यासाठी प्रयागराजच्या शेजारच्या जिल्ह्यांतून येणारी वाहने जिल्ह्याच्या सीमेवरच थांबविण्यात येणार आहेत. शहरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
गर्दी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आयएएस अधिकारी आशिष गोयल आणि भानू गोस्वामी यांना तातडीने प्रयागराजला जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मोठ्या घटनांचा अनुभव असलेल्या पाच विशेष सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गर्दी व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना महाकुंभ व्यवस्थापनाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रयागराजचे एडीजी आणि जिल्हाधिकाऱ्यांना सर्व भाविकांचे सुरक्षित प्रस्थान सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गर्दी नियंत्रणासाठी पुढील उपाययोजना
भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी अधिकाऱ्यांना रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधण्याचे निर्देश. परिवहन महामंडळाला जादा बसेस तैनात करण्याचे आदेश.सीमांवर होल्डिंग एरिया तयार करून भाविकांना नियोजनबद्ध पद्धतीने पुढे पाठविण्याची व्यवस्था. या होल्डिंग एरियामध्ये अन्न, पिण्याचे पाणी आणि विजेची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
चेंगराचेंगरीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला असून, त्यामध्ये न्यायमूर्ती हर्ष कुमार, माजी डीजी व्हीके गुप्ता आणि निवृत्त आयएएस अधिकारी व्हीके सिंह यांचा समावेश आहे. चौकशीबरोबरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.