भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या पाठपुराव्याने येथील माजी नगरसेवक संतोष चौधरी (दाढी) आणि रवींद्र सपकाळे यांनी प्रवेश घेतला आहे.
उमेश नेमाडे यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात संघटना उभारणीचे काम सुरू आहे. यात ठिकठिकाणचे मान्यवर हे पक्षात दाखल होत आहेत. यात, भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष चौधरी उर्फ संतोष दाढी तसेच माजी नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यातील संतोष (दाढी) चौधरी यांच्यावर पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हा प्रवेश सोहळा मुंबई येथील पक्ष कार्यालयात पार पडला. पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व मंत्री हसन मुश्रीफ यांनी या दोघांचे स्वागत केले. याप्रसंगी रावेर लोकसभा मतदारसंघातील ठिकठिकाणचे पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी नगरसेवक, गटनेते आदींचाही पक्षात प्रवेश झाला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, रवींद्र नाना पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.