अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सारबेटा येथे ४ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे लोकार्पण माजी मंत्री आ. अनिल पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उपकेंद्राच्या स्थापनेमुळे अनेक गावांतील वीजपुरवठ्याची समस्या सुटणार असून, शेती, उद्योग आणि ग्रामस्थांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहेत. अशी माहिती आ. अनिल पाटील यांनी दिली आहे.
गावांच्या विजेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा
अमळनेर तालुक्यातील हेडावे, सुंदरपट्टी, रढावण, राजोरे, एकरुखी, सारबेटा बु., सारबेटा खु., ढेकु बु., ढेकु खु., जुनोने, खेडी, रामेश्वर, पळासदळे अशा अनेक गावांना सतत अनियमित वीजपुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतकरी आणि लघुउद्योजकांना ही समस्या अधिक त्रासदायक ठरत होती. आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या उपकेंद्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
शेती आणि उद्योगांना मिळणार बळकटी
विकासासाठी वीजपुरवठा ही अत्यावश्यक गरज असून, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनक्षमता वाढेल. कृषी उपक्रमांसाठी अखंडित वीजपुरवठा मिळाल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल. लघुउद्योगांना चालना मिळून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे या गावांचा विकास अधिक वेगाने होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
आमदार अनिल पाटील यांनी या प्रकल्पाबाबत सांगितले की, “ग्रामीण भागाचा विकास हे माझे प्राधान्य आहे. हा प्रकल्प केवळ वीजपुरवठ्यापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देणारा आहे.” असे सांगितले. याप्रसंगी या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, प्रा. सुरेश पाटील, भोजमल पाटील, समाधान धनगर, महारू आण्णा ढेकु, रढावण सरपंच भैय्यासाहेब पाटील, सारबेटा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.