कोरोनाच्या निर्मूलनानंतर फैजपुरात काँग्रेसचे राज्य अधिवेशन : पटोले ( व्हिडीओ)

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । फैजपूरच्या भूमिवरून इंग्रजांच्या विरूध्द रणशिंग फुंकण्यात आले होते. आज केंद्रातील सत्ताधार्‍यांनी हीच स्थिती आणली आहे. यामुळे सरकार विरूध्दची लढाई ही याच पवित्र भूमिवरून सुरू झाली आहे. कोरोनाची आपत्ती संपल्यानंतर फैजपूर येथे काँग्रेसचे राज्य अधिवेशन घेण्यात येणार असून यासाठी सोनियाजी आणि राहूलजी गांधी यांना आमंत्रीत करण्यात येणार असल्याची माहिती आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते येथील मेळाव्यात बोलत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज एक दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषी कायद्यांच्या दहन आंदोलनासह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेे. याप्रसंगी काँग्रेसच्या प्रदेशा कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, माजी खासदार उल्हासदादा पाटील, आ. शिरीष चौधरी, माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर कॉलेज परिसरात काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना नाना पटोले यांनी फैजपूर येथील भूमि ही काँग्रेससाठी अतिशय महत्वाची व ऐतिहासीक असल्याचे प्रतिपादन केले. या परिसरात हजारो स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले असल्याचे ते म्हणाले. फैजपुरात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. येते ब्रिटीशांच्या विरूध्दचा लढा सुरू असतांना अधिवेशन घेण्यात आले होते. याच पवित्र भूमित आम्ही केंद्र सरकारच्या काळ्या कृषी कायद्यांचे दहन केले. हे तिन्ही कायदे शेतकर्‍यांच्या विरूध्द असून दिल्ली येथे सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू असतांनाही पंतप्रधान त्यांच्याशी बोलण्यासाठी तयार नाहीत. अशा अत्याचारी पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे कायद्यांच्या मसुद्याचे दहन केले असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

आता खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे पटोले म्हणाले. याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. २०१४ साली भाजपने मोठी आश्‍वासने देऊन सत्ता मिळवली. मात्र नंतर जीएसटी, नोटबंदी आदींच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले गेले. तर यानंतर आलेल्या कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. कोरोनाच्या आड देशात अघोषीत आणीबाणी लादण्यात आलेली आहे. सर्वांना यामुळे अडचणी आल्या असल्या तरी मोदींच्या मुठभर मित्रांना मात्र याचा खूप लाभ झाल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला.

मोदी यांनी कोरोनाची आपत्ती सुरू असतांनाही मध्यप्रदेशातील सरकार पडण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर मात्र देशाला संपूर्ण ताट वाजवायला लावले. मोदी सरकारने देशाच्या मालकीच्या सर्व मालमत्ता विकण्यास काढले आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असले तरी भाजपने सर्व काही विक्रीसाठी काढले आहे. आज देशाचे संविधान वाचवायचे असेल तर काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकणार आहे. फैजपुरच्या पवित्र मातीला भाळी लाऊन राज्यभरात भाजपची दंडेलशाही मोडून काढण्यासाठी चळवळ निर्माण करणार असल्याची घोषणा पटोले यांनी केली. आधी देखील खूपदा महामार्‍या आल्या असल्या तरी आपण याचा समर्थपणे प्रतिकार केला. देवी, पोलीओ आदी याची उदाहरणे आहेत. मात्र आम्ही कधी याचा गाजावाजा केला नाही. दिल्लीतील सरकार हे देशाला बरबाद करणारे आहे.

दरम्यान, कोरोनाची आपत्ती संपल्यानंतर फैजपूर येथे प्रदेश काँग्रेसचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याी महत्वाची घोषणा नाना पटोले यांनी केली. या अधिवेशनाला सोनियाजी आणि राहूल गांधी यांना आमंत्रीत करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

सध्या कोरोनाची आपत्ती थोडी कमी झाली असल्यामुळे आपण जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेलो आहोत. फैजपूर येथे काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन घेण्यात आले होते. तेव्हाचा लढा हा इंग्रजांच्या विरूध्द होता. तर सध्याचे केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. देशात सरकार विरूध्द संतप्त भावना असून मोदी सरकारला २०२४ साली जनता धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी केला. तर, महागाईने सर्वसामान्य नागरिक हे त्रस्त झालेले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

खालील व्हिडीओत पहा नाना पटोले नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/508992935887325/videos/204421051546854

Protected Content