फैजपूर प्रतिनिधी । महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसीत व्हावी आणि त्यांच्या मनात वाङ्मयीन अभिरूची निर्माण व्हावी, या उद्देशाने धनाजी नाना महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात आली असून प्रसिध्द व्यंगहास्यकवी वसंत इंगळे यांच्याहस्ते ‘मराठी वाङ्मय मंडळा’चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनाजी नाना महाविद्यालयात (दि.28) रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द व्यंगहास्यकवी मा.वसंत इंगळे यांच्याहस्ते ‘मराठी वाङ्मय मंडळा’चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी ‘नवरा भोवरा’हा हास्यव्यंग कवितांवर आधारित एकपात्री प्रयोग साभिनय सादर केले. आपल्या प्रयोगातून नवरा बायकोच्या जीवनातील गंमतीजंमती अतिशय विनोदी शैलीतून सादरीकरण करुन श्रोत्यांची दाद मिळवली. प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्तविकामधून या कार्यक्रम आयोजन संदर्भातील भूमिका मांडली. या कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.मनोहर सुरवाडे यांनी करताना मराठी वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. तसेच हास्य विनोदामुळे आनंदी आयुष्य कसे जगावे, यासाठी प्रेरणा मिळते. तसेच भरपूर हसा असे श्रोत्यांना आवाहन त्यांनी केले. प्रा.डॉ. सिंधू भंगाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
सुत्रसंचालन प्रा.डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.सतिष चौधरी, प्रा. चौधरी यांची व मराठी विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.