मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आज दिनांक 15 ऑक्टोबर 2022 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे त्याचप्रमाणे वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून Rational Thinking Cell (D.O.S.T.) चे उद्घाटन श्रीमती अर्चना दिनकर भोळे जे. ई.स्कूल व ज्यु. कॉलेज मुक्ताईनगर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन हे होते.
प्रास्ताविक डॉ. संजीव साळवे यांनी केले आपल्या प्रास्ताविकामध्ये नमूद करत असताना त्यांनी आजपर्यंत आपण ज्या रूढी,परंपरांना,अंधश्रद्धांना बळी पडत आहोत त्यापासून दूर जाऊन एका नव्या समाजाची निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे त्याचप्रमाणे समाजातल्या अनिष्ट चालीरीतींवर आपण प्रतिक्रिया नोंदवून त्या कशा पद्धतीने रोखता येतील यासंदर्भातलाही विचार यानिमित्ताने मांडला प्रस्तुत प्रास्ताविकामध्ये त्यांनी भविष्यामध्ये या सेलच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या उपक्रमांची आखणी केलेली आहे त्या संदर्भातही मांडणी केली त्यामध्ये प्रामुख्याने स्मशान सहल,निसर्ग सहल,चमत्कार शिका प्रशिक्षण कार्यशाळा तद्वतच विवेकवादी विचाराची चळवळ अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सजग आणि विवेकवादी विचारी नागरिक बनवण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली.
आपल्या उद्घाटन पर भाषणामध्ये श्रीमती अर्चना भोळे यांनी म्हटले की या देशामध्ये सती प्रथा नावाची जीर्ण रूढी होती कालांतराने ती बंद पडली त्यामुळे अशा ज्या काही चुकीच्या प्रथा आणि परंपरा आहे त्या कालांतराने बंद पडतील पण त्यासाठी आपण सजग आणि विचारी असण्याची आवश्यकता आहे आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटनांचा आपल्याला विवेकवादी पद्धतीने विचार करता आला पाहिजे तरच आपल्याला नव समाज निर्मितीची अपेक्षा गृहीत धरता येईल अन्यथा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे ती परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी या सेलची निर्मिती आहे म्हणून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सदर सेलचे सदस्यत्व स्वीकारून त्यामध्ये काम करण्यासाठी सज्ज व्हावे अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त केली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य महोदय म्हणाले की आम्ही विज्ञानाची कास धरली पाहिजे कारण विज्ञान मला विचार करायला शिकवते विज्ञान मला प्रयोग करायला शिकवते आणि विज्ञान मला वारंवार त्याची प्रचिती घ्यायला पण शिकवते आणि त्या आधारावर त्याच अनुमान काढता येतं तद्वतच आपल्याला कदाचित आज काही गोष्टी माहिती नसतील त्या उद्या माहिती होतील पण त्या कोणत्या मार्गाने माहिती होतील हे मात्र नक्कीच आपल्याला आज विज्ञानाचा आधार घेतल्यावर माहिती आहे आणि म्हणून आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी विज्ञाननिष्ठ होऊन आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आपल्या संविधानामध्ये नमूद केला आहे त्याचं अनुसरण करण आणि इतरांना ते करायला लावणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले.
डॉ. प्रतिभा ढाके यांनी स्वानुभव कथन करत आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या अनेक घटनांचा परामर्श घेत आपण काय करावं आणि काय करू नये याचा सत सत विवेक बुद्धी वापरून विचार करावा असे या निमित्ताने सांगितले.
सदर कार्यक्रमांमध्ये MSFDA मार्फत प्रशिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांपैकी निकिता झांबरे या विद्यार्थिनींनीने प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये काय अनुभव घेतला आणि प्रशिक्षण किती दर्जेदार आणि विचार करायला भाग पाडणार होतं यावर प्रकाश टाकला आणि शक्यतोवर सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हाव अशी अपेक्षाही व्यक्त केली.
संपूर्ण कार्यक्रमाचा सूत्रसंचालन वैष्णवी जंगले या विद्यार्थिनीने केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम गायकवाड, निखिल रायपुरे, पियुष बडोगे, विवेक चौधरी, निकिता झांबरे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले