अल्पसंख्यांक दिनानिमित्त रोजगार मार्गदर्शन मेळावा उत्साहात

Berojgari 1

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी अल्पसंख्यांक दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन मेळावा नुकताच पार पडला.

या मेळाव्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय व्यवस्थापक अरुण प्रकाश यांनी मुद्रा बँक योजना व बँकेच्या विविध कर्ज योजनांविषयी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करुन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे जिल्हा उद्योग केंद्रांचे श्री. ओझरकर आणि मौलाना आझाद विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पितांबर पाटील यांनी महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज योजनांची माहिती देऊन उमेदवारांना स्वयंरोजगाराकडे वळण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे इकरा एज्युकेशन सोसायटीचे गफ्फार मलिक आणि करीम सालार यांनी उपस्थित उमेदवारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या मार्गदर्शन मेळाव्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगावच्या सहाय्यक संचालक श्रीमती अनिसा तडवी यांनी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, उमेदवारांची नांव नोंदणी विशेष अभियान, जागतिक कौशल्य स्पर्धा 2021 आणि नियोजित मॅरेथॉन स्पर्धेबाबत मार्गदर्शन करुन उपस्थितांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

मार्गदर्शन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कार्यालयातील मिलींद देशपांडे, दिपक बोरसे, इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जुबेर मलिक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content