खडसे महाविद्यालयात ‘बहिणाबाई अभ्यासिका’चे उद्घाटन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खडसे महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कृत बहिणाबाई अभ्यासिकेचे उद्घाटन  कुलगुरू प्रा. डॉ. व्ही एल. माहेश्वरी यांनी यांच्याहस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय चेअरमन अॅड. रोहिणीताई खडसे- खेवलकर उपस्थित होत्या.

या उदघाटनप्रसंगी विद्यापीठाचे  व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे , अधिसभा सदस्य दिनेश चव्हाण, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, विशेष कार्यकारी अधिकारी धनंजय गुजराथी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन केले. उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विविध नव-नवीन योजना विषयी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्गांना माहिती दिली. बहिणाबाई अभ्यासिका ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करणारी असून या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून कुटुंब,समाज आणि राष्ट्र निर्मितीत सहभाग नोंदवतील अशी आशा व्यक्त करून बहिणाबाई अभ्यासिका उद्घाटनास शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात सन्मानिय अॅड  रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी विद्यापीठाने महाविद्यालयास  बहिणाबाई अभ्यासिका केंद्र  दिल्याबद्दल आभार मानले, तसेच बहिणाबाई अभ्यासिकेचा मुक्ताईनगरच्या पंचक्रोशीतील तमाम विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले उज्वल भविष्य सिद्ध करावे असे आवाहन केले.

बहिणाबाई अभ्यासिका कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एच. ए. महाजन, उपप्राचार्य  डॉ.अनिल पाटील व  डॉ.राजेंद्र चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अतुल बढे यांनी तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बहिणाबाई अभ्यासिकेचे समन्वयक प्रा. राजन खेडकर यांनी केले.  या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Protected Content