३३ व्या रस्ता सुरक्षा अभ‍ियानाचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रस्ता सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी आहे. रस्ता सुरक्षा हे केवळ अभियान काळापुरते मर्यादित न ठेवता नेहमीसाठी याची अंमलबजावणी करा. रस्ता सुरक्षा  ही काळाची गरज असून  यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून रस्ता सुरक्षा अभियान ही लोक चळवळ निर्माण करून जास्तीत जास्त जनजागृती करून रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करा. रस्ता सप्ताह हा फक्त सात द‍िवसासाठीचा सप्ताह नसून जीवन सप्ताह आहे. असे प्रत‍िप्रादन प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गाव‍ित, उप प्रादेश‍िक परिवहन अध‍िकारी श्याम लोही, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक श‍िवाजी पवार, एसटीचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर‌ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, रस्ते अपघाताच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा ६ वा क्रमांक आहे. देशातील एकूण अपघातापैकी 7.2 टक्के रस्ता अपघात महाराष्ट्रात होतात. देशातील एकूण अपघातापैकी 55% अपघात हे राष्ट्रीय व राज्य महामार्गावर होत असताना दिसून येते. रस्ता अपघातामध्ये सर्वाधिक मृत्यू हे 18 ते 45 या वयोगटातील म्हणजे तरुणांचे 66.5% इतके आहे. आपण स्वतःच्या मनावर ताबा ठेवला तर अपघात थांबवू शकतो. रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने मर्यादित‌ वेगाने वाहन चालवावे. प्रत्येकाने रस्ते नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.  प्रादेश‍िक पर‍िवहन कार्यालयाच्या बळकटीकरणासाठी ज‍िल्हा न‍ियोजनाच्या माध्यमातून १० लाखांचा निधी वितरित करण्यात यावा. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, अपघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षा म्हणजे आपल्या कुटुंबाची सुरक्षा आहे. सहा ते सात पेक्षा जास्त वाहन चालविण्यात येऊ नये.‌ महसूल‌ विभागानंतर परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान व डिजिटलचा वापर करण्यात आला‌. परिवहन विभागाने सर्व परवाने ऑनलाईन केले आहे. त्यामुळे कामांत पारदर्शकता व गतिमानता आली आहे. आपल्या कुटुंबासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

श्री.नखाते म्हणाले की, रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती करण्याचे काम पोलीस व परिवहन विभाग करत आहे. नागरिकांनी ही स्वयंस्फूर्तीने वाहतूकीचे नियम पाळावेत. यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते रस्ता सुरक्षा पुस्त‍िकेचे प्रकाशन करण्यात आले. सेल्फी पॉईंट, रस्ते व‍िषयक न‍ियम फलकांचे उद्घाटन ही पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताव‍िक श्याम लोही यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.

रस्ता सुरक्षा कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील व ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या हस्ते शहरातील ७ गुलाबी र‍िक्षा मह‍िला चालकांना तीळगुळ वाटप करत मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम संपल्यानंतर मह‍िला चालकांच्या एका गुलाबी र‍िक्षेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील व ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय ते ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयापर्यंत सोबत प्रवास केला.

Protected Content