Home Cities जळगाव जळगावात अनुष्का शिंपी यांच्या ‘बियॉन्ड बाउंड्रीज’ प्रदर्शनाचा आज उद्घाटन सोहळा

जळगावात अनुष्का शिंपी यांच्या ‘बियॉन्ड बाउंड्रीज’ प्रदर्शनाचा आज उद्घाटन सोहळा

0
54


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चित्रकलेची आवड असलेल्या जळगावकर रसिकांसाठी एक अनोखी कलानुभूती देणारे ‘बियॉन्ड बाउंड्रीज’ (Beyond Boundaries) हे एकल चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध युवा कलाकार अनुष्का शिंपी यांच्या कलाकृतींचे हे विशेष प्रदर्शन असून, क्रिकेट या लोकप्रिय खेळाचे विविध भावविश्व चारकोल (कोळसा) माध्यमातून कॅनव्हासवर साकारण्यात आले आहे. क्रिकेट आणि चारकोल कलेचे अनोखे फ्युजन हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

‘कलाशाळा, जळगाव’चे तरुण भाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे एकल चित्रप्रदर्शन साकारण्यात येत आहे. क्रिकेटमधील क्षण, खेळाडूंच्या हालचाली, मैदानावरील भावना आणि खेळातील बारकावे चारकोलच्या विविध छटांमधून अत्यंत कलात्मक पद्धतीने मांडण्यात आले आहेत. काळ्या-पांढऱ्या रंगछटांच्या माध्यमातून क्रिकेटमधील ऊर्जा आणि सौंदर्य दाखविण्याचा अनोखा प्रयत्न अनुष्का शिंपी यांनी केला आहे.

या प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडचे अथंग जैन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. धर्मेंद्र कुमार सिंग, जिल्हा परिषद जळगावचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील तसेच पीएनजी जळगावचे व्यवस्थापक गिरीश डेरे यांचा समावेश आहे.हे कलाप्रदर्शन १८ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत रसिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत असून, प्रदर्शनाचे आयोजन पी. एन. गाडगीळ अँड सन्स (P.N. Gadgil & Sons), रिंग रोड, जळगाव येथे करण्यात आले आहे.

‘पी. एन. गाडगीळ अँड सन्स आर्ट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन कला आणि क्रीडा यांचा सुंदर मिलाफ अनुभवण्याची संधी रसिकांना उपलब्ध करून देणार आहे. क्रिकेटप्रेमी, कलाप्रेमी तसेच नवोदित कलाकारांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे. अनुष्का शिंपी यांच्या या आगळ्यावेगळ्या कलाकृतींचा अनुभव घेण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४०३५१२४२९ किंवा ८३०८७५२१८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कलाकार अनुष्का यांच्या कलाकृती पाहण्यासाठी त्यांच्या ‘artist_anushka12’ या इंस्टाग्राम हँडलला भेट देता येणार आहे.


Protected Content

Play sound