जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली असून येत्या काही तासांमध्ये संपूर्ण निकाल समोर येणार आहे.
जळगाव विधानसभा मतदारसंघात यंदा आमदार राजूमामा भोळे यांच्या विरूध्द लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक होते. तसेच भाजपमधून देखील इच्छुकांची संख्या वाढीस लागली होती. अर्थात पक्षातील प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आ. राजूमामा भोळे यांना तिसऱ्यांना भाजपची उमेदवारी मिळाली. यामुळे भाजपमधून बंडखोरी करत माजी उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे आणि माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे शिवसेना-उबाठातून माजी महापौर जयश्री महाजन यांना तिकिट मिळाल्याने बंडखोरी करत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील मैदानात उतरल्यामुळे येथे बहुरंगी लढत झाली. जिल्ह्यातील सर्वाधीक 29 उमेदवार येथूनच निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. निवडणुकीच्या काळात सर्व उमेदवारांनी एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.
या पार्श्वभूमिवर, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आली. यात प्रारंभी टपालाने करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग, वयोवृध्द आदींनी केलेल्या मतदानाचा समावेश होता. या टपाली मतदानाच्या पहिल्या फेरीत आमदार राजूमामा भोळे यांना 9091 तर जयश्री महाजन यांना 2042 इतकी मते मिळाली. यामुळे पहिल्याच फेरीत आमदार भोळे यांना लीड मिळाल्याचे अधोरेखीत झाले आहे. तर, आता मतमोजणी यंत्रांची मतमोजणी होणार आहे. यात फेरीनिहाय मते मोजण्यात येणार आहेत. यात काही तासांमध्येच निकालाचा कल कळून येणार आहे. आम्ही आपल्याला यातील प्रत्येक अपडेट देणार आहोत.