जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघ नगर येथील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत रंगतरंग महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून महोत्सवाचा आनंद घेतला.
आनंद , उत्साह , चैतन्य भरलेला हा उत्सव सोहळा. रंगतरंग म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कला गुणांना विकसित करण्याचे माध्यम होय. रंगतरंग, कला महोत्सवांमध्ये विद्यार्थ्यांनी “संतांची मांदियाळी” या संकल्पनेवर आधारित विविध संतांच्या जीवनातील उत्कट प्रसंग, समाजाला असलेली गरज व समाजाला केलेले प्रबोधन, याची विद्यार्थ्यांनी नृत्य व प्रसंगातून सांगड घातली. यात बाराव्या ते सोळाव्या शतकातील संत परंपरा दाखवण्याचा अविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केला.
विविध कला प्रकार यामध्ये अभिवाचन ,कथाकथन, किल्ले बनवणे ,रांगोळी ,चित्रकला, वकृत्व, गीतगायन ,नाट्यछटा सादर केल्या.या विविध कला प्रकारात विद्यार्थ्यांनी संत परंपरा साकारली. रांगोळी या प्रकारात विविध संतांचे रेखाटन, चित्रकला या प्रकारात विविध संतांची व साहित्याची रेखाटने ,वकृत्व या प्रकारात संतांचे सामाजिक कार्य व संतपरंपरा या विषयी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. अभिवाचन मध्ये संतांच्या जीवनातील प्रबोधन, प्रसंग, कथानकामध्ये विविध संतांची कामगिरी, गीतगायन मध्ये विविध अभंग व संत रचना विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका वैशाली पाटील यांनी सहकार्य केले. रंगतरंग प्रमुख म्हणून माधुरी नाईक, भाग्यश्री वारुडकर तसेच कला महोत्सव प्रमुख सचिन गायकवाड, सहायक दिपाली सहजे यांनी नियोजन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.