पाचोऱ्यात भाजपातर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मनुस्मृतीतील श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेशाचा निषेध व्यक्त करत शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले असुन याच्या निषेधार्थ ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता पाचोरा भारतीय जनता पक्षातर्फे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सतिष शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, प्रदिप पाटील, प्रदिप पाटील, दिपक माने, समाधान मुळे, जगदिश पाटील, योगेश ठाकुर यांचेसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे संतप्त झालेले शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. तसेच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, हे करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेले पोस्टरही फाडले. त्यावरून त्यांच्याविरुद्ध शिंदेसेनेने नाशिक, भाजपने पुण्यात येथे निदर्शने केली. आव्हाडांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी अजित पवार गटाने केली. तत्पूर्वीच आव्हाडांनी अनवधानाने फोटो फाडला गेला, असे सांगत माफी मागितली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’ मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. आव्हाड यांनी २८ मे रोजी महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. आव्हाड यांनी त्याची पुनरावृत्ती केल्याने पाचोरा भाजपातर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Protected Content