जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढ होत होती, शहरी भागात व ग्रामीण भागात सुरुवातीला रुग्णांमध्ये वाढ होत होती, तसेच आता १० हजार ७९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या काळात १३९ रुग्ण उपचार घेत आहे.
दुसऱ्या लाटेत शहरी व ग्रामीण भागात लग्न समारंभ, अंत्ययात्रा, दारावर जाण्याची प्रथा, बाजार इ. कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला होता. पहिल्या लाटेपेक्षा तो अधिक तिव्र होता. सुरुवातीला शहरी भागात व नंतर ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून आले होते. तालुक्यात एकूण ११०७९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यापैकी १०७९५ रुग्ण बरे झाले आहेत तर १४५ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच १३९ रुग्ण हे सध्या उपचार घेत आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण हे अधिक होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मृत्यु अधिक झाले आहेत.
तालुक्याचा बरे होण्याचा दर हा ९४.१६ % असून कोरोनाबाधित दर २% खाली आला आहे. तर मृत्यू दर हा १.३१ इतका आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात मुख्यधिकारी राहुल पाटील व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक पहुर राहुल खताळ यांनी राबविलेल्या कडक कारवाईच्या सत्रामुळे, रिकामटेकडे फिरणाऱ्यांवर ठेवलेला चाप तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केलेल्या नियोजनानुसार वैद्यकीय अधिकारी, समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांनी प्रत्येक गावागावात जाऊन कोरोना टेस्टिंगचे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास तत्काळ ग्रामपंचायतीला कळवून त्याला होमक्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला.
तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या मदतीने प्रत्येक गावात “माझे कुटुंब माझी जबाबदारी”या मोहिमेची प्रभावीपणे अंबालबजावणी करून संशयीत शोधून काढले. तसेच बधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे तालुक्यात तहसीलदार यांच्या निर्देशानुसार कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास मृतांच्या परिवारातील सदस्यांच्या व त्यांच्या संपर्कातील नागरिकांच्या ४८ तासाच्या आत कोरोनाचाचण्या करण्यात आल्या.
ग्रामीण भागाच्या आरोग्य यंत्रणेने व जामनेर नगरपालिकेने अधिकाधिक चाचण्या केल्या तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आर. के. पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.जितेंद्र वानखेडे यांनी व जामनेर – पहुर च्या सर्व स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी यांनी एकत्रित मिळून अत्यवस्थ रुग्णांवर योग्य उपचार व सेवा करून मृत्यू दर कमी ठेवला. यानंतर ही मास्क, वारंवार हात धुणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे, गर्दी न करणे व आपली पाळी आल्यानंतर लसीकरण करून घेतल्यास पुढील येणारी तिसरी कोरोनाची लाट टाळून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या जिवीतहानीला दुर सारू शकतो, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांनी केले आहे.