जळगावातील दाणाबाजारातील चार दुकाने केले सील; पालिकेची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर गेल्या आठवड्यापासून कारवाई सुरू आहे. शुक्रवारी दाणाबाजारातील चार दुकानांना सील लावण्यात आले तर मास्क न लावणाऱ्या चौघांना दंडात्मक कारवाई केली आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपला जीव सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे व मास्क वापरणे अनिवार्य आहे. नियम मोडणाऱ्यांवर पालिकेच्या पथकांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. परंतु, त्यानंतरही नागरिकांमध्ये शहाणपणा आलेला दिसत नाही. पालिकेकडून शुक्रवारीदेखील दाणाबाजार व परिसरात दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात दाणाबाजारातील तीन दुकानांत ग्राहकांची गर्दी आढळून आली. साेशल डिस्टन्सिंग न पाळल्याने ही दुकाने सील करण्यात आली आहेत. यात रमणलाल अॅण्ड सन्स, सीराज अजीज राणाणी, गाेपालदास सिताराम मणियार यांच्या दुकानांचा समावेश आहे. तसेच सुभाष चौकातील प्रतिक कासार यांच्या अन्विक किचन वेअर हे दुकान अत्याश्यक सेवेत नसल्याने सील करण्यात आले. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान, संजय ठाकुर, विजय देशमुख, वैभव धर्माधिकारी, किशोर सोनवणे यांनी ही कारवाई केली.

Protected Content