जळगाव प्रतिनिधी । शहरातील आदर्शनगर परिसरात उज्ज्वल स्प्राऊटर या शाळेजवळील रस्त्यावर शतपावली करणार्या विवाहितेची 12 ग्रॅमची 40 हजारांची मंगलपोत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, आदर्शनगर येथे अमृतकलश अपार्टंमेंट येथे तेजस उल्हास चौधरी हे काका, काकू, चुलतभाऊ व बहिण या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तेजस चौधरी यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी चेन्नई, तामिलनाडू येथे राहणारा चुलतभाऊ हेमंत चौधरी व हेमंतची पत्नी कामिक्षी कुमार हे आले आहेत. 29 रोजी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास तेजस चौधरी हे त्यांची वहिनी कामिक्षी कुमार यांच्यासोबत उज्ज्वल स्पाऊटर शाळेजवळ शतपावली करीत होते. यादरम्यान अंदाजे 20 ते 25 वर्ष वयाचे दोन जण दुचाकीने अचानपणे समोरुन आले. दुचाकीवरील दोघांपैकी एकाने कामिक्षी कुमार यांच्या गळ्यातील मंगलपोत हिसकावून दोघेही आरटीओ कार्यालयाच्या दिशेने पसार झाले. याप्रकरणी तेजस चौधरी यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात 12 ग्रॅम, 40 हजार रुपये किंमतीची मंगलपोत लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी हे करीत आहेत.