हरित वारी निर्मळ वारीमध्ये स्वयंसेवकांनी दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि किसान महाविद्यालय व राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हरित वारी, स्वच्छ वारी, निर्मळ वारी अभियान राबविण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. व्ही. एल.माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी डॉ. सचिन नांद्रे , संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांची प्रमुख उपस्थितीती होती.

पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्रातून लाखो लोक वारीसाठी जात असतात. अनावधानाने या वारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि थर्माकोलचा उपयोग केला जातो. प्लॅस्टिक मुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. तसेच वारीत उपयोगात येणाऱ्या प्लास्टिक मुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. हा प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर थांबावा यासाठी गेल्या काही वर्षापासून हरित वारी, निर्मल वारी हे अभियान राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. खानदेशातील अमळनेर येथील प्रसिद्ध सखाराम महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूर येथे दरवर्षी यात्रेनिमित्त जात असते. आज पारोळा येथे मुक्कामी पालखी आली असता, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वारीमध्ये सहभागी असलेल्या सर्व वारकरींना मदत केली. त्याचप्रमाणे प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करू नये यासाठी त्यांनी आवाहन केले. यावेळी किसान महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर करून प्लास्टिक मुक्तीच्या संदेश दिला. वारी म्हणजे शिस्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे, यावेळी वारीतील शिस्तीचे धडे सुद्धा स्वयंसेवकांना वारकऱ्यांनी दिले. विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक अधिष्ठान वाढावे, ज्ञान वृद्विंगत व्हावे यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. असे गौरव उद्गार प्रसाद महाराज यांनी काढले.

या अभियानाची त्यांनी प्रशंसा केली. या वारीमध्ये कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, संचालक ऍड. रोहन मोरे, डॉ.संजय शिंगणे, उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी सहभाग नोंदवला आणि काही काळ ते या वारी सोबत सुद्धा चालले. यावेळी सखाराम महाराज संस्थांचे प्रमुख श्री प्रसाद महाराज यांच्याशी कुलगुरू माहेश्वरी यांनी प्लास्टिक मुक्त वारी, निर्मल वारी याविषयी चर्चा सुद्धा केली. यावेळी किसान महाविद्यालय आणि राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रत्येकी २० स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मनीष करंजे, डॉ. डी.एल.सूर्यवंशी डॉ. प्रदीप औजेकर, डॉ. अनिता मुडावदकर, प्रा.काकासाहेब गायकवाड यांनी केले.

Protected Content