चाळीसगाव प्रतिनिधी | शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पुनर्निमार्णासाठी सुरू असलेल्या उत्खननामध्ये दोन अस्थीकलश आढळून आले असून यात डॉ. बाबासाहेबांच्या अस्थी असल्याची माहिती स्थानिक आंबेडकरी चळवळीतल्या मान्यवरांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, नगरसेविका सायली जाधव आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव यांच्या प्रयत्नांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पुनर्निमीतीचे काम वेगान सुरू आहे. यासाठी पुतळ्याच्या परिसरात उत्खनन करण्यात येत आहे. हे उत्खनन सुरू असतांना आज दुपारी येथे दोन कलश आढळून आले. कामगारांनी याची माहिती रोशन जाधव यांना दिली. क्षणार्धात हे वृत्त शहरात पसरताच शेकडो आबालवृध्दांनी तेथे धाव घेतली.
यातील एक कलश हा अतिशय काळीजपूर्वक काढण्यात आला असून यानंतर दुसरा कलश देखील काढण्यात आला. यातील एका कलशावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव १९५८ असे तर दुसर्या कलशावर इंद्रायणी बाई पुंडलीक वाघ सायगाव असे लिहलेले आहे. या संदर्भात समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागूल यांनी माहिती देतांना सांगितले की, त्यांना त्यांच्या वडिलांनी याबाबत आधीच वर्तमानपत्राच्या कात्रणासह माहिती दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्यानंतर तिसर्या दिवशी त्यांचे वडील हे चैत्यभूमिवर गेले असतांना त्यांनी आदरणीय भैय्यासाहेब आंबेडकर यांच्याकडून बाबासाहेबांच्या अस्थी घेऊन त्या पुतळ्याच्या खाली ठेवल्या होत्या. हा पुतळा १९५८ साली उभारण्यात आला होता. यामुळे या पुतळ्याच्या पुनर्निमाणाच्या कामामुळे फार मोठा ऐतिहासीक वारसा समोर आल्याची माहिती बागूल यांनी दिली. दरम्यान, हा कलश पुन्हा एकदा पुतळ्या खाली ठेवण्यात येणार असल्याचे बागूल म्हणाले. याप्रसंगी नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेविका सायली जाधव, सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कलशांबाबतची माहिती मिळताच तहसीलदार अमोल मोरे, निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि विशाल टकले, निसार सैयद, गणेश पाटील, महसूलचे तलाठी यांनी भेट देऊन याची माहिती घेतली. या कलशाबाबत प्रशासकीय नोंद घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार आणि पोलीस निरिक्षकांनी दिली.