भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सोपान चौकात ४६ वर्षीय महिला घरी पायी जात असताना अज्ञात चोरट्यांनी पर्स हिसकावून पर्समधील रोकडसह सोन्याचे पेंडल आणि मोबाईल असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मीनाक्षी सुधीर चौधरी (वय 46 रा. पाटील प्लाझा शांती नगर भुसावळ) ह्या रविवारी 25 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहरातील सोपान चौक येथून पायी जात असताना अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर पाठीमागून येऊन विवाहितेच्या हातातील पर्स जबरी हिसकावून पसार झाले. विवाहितेच्या पर्समध्ये साडेचार हजार रुपयांची रोकड, १६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल, २ हजार रुपयाचा मोबाईल असा एकूण २२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मीनाक्षी चौधरी यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिसात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गहू करीत आहे.