यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथे उसनवार दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सुरेश मकडू पाटील (वय-५०) रा. आडगाव ता. यावल जि.जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी गावातील योगेश मुरलीधर पाटील याला उसनवारीने पैसे दिले होते. बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी सुरेश पाटील यांनी उसनवारीने दिलेले पैसे योगेशकडे मागितले होते. याचा राग योगेशला आल्याने त्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने सुरेश पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी दुपारी २ वाजता सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.