Home Cities जळगाव पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सधारकांची मागणी

पथविक्रेता समिती कार्यान्वित करा, फुले मार्केटमधील हॉकर्सधारकांची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महात्मा फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील शेकडो हॉकर्स विक्रेत्यांवर १ जून २०२५ पासून जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमुळे उपासमारीची वेळ आली आहे. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत हॉकर्सचे व्यवसाय बंद पडले असून, त्यांच्या कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पथविक्रेता समिती गठीत झाली असून तात्काळ कार्यान्वित करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन हॉकर्स बांधवांतर्फे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना देण्यात आले आहे.

महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केट हॉकर्स युनियन, जळगाव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिक्रमण पथकाच्या कारवाईमुळे हॉकर्स बांधवांचे व्यवसाय पूर्णपणे थांबले आहेत. जून महिन्यात शाळा सुरू झाल्याने मुला-मुलींच्या शिक्षणावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर कुटुंबातील वृद्ध आई-वडिलांच्या औषधोपचाराचा प्रश्नही गंभीर बनला आहे. रोजचा प्रपंच चालवणेही कठीण झाल्याने अनेक हॉकर्स अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. युनियनने म्हटले आहे की, फुले मार्केटमधील बहुतांश हॉकर्स २५ ते ३० वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहेत आणि ते सर्व नोंदणीकृत आहेत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अंमलबजावणी करण्याची आणि पथविक्रेता समिती गठीत झाल्यामुळे हॉकर्सना फुले मार्केटमध्ये पांढरे पट्टे आखून योग्य नियोजन करून पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

या गंभीर परिस्थितीत, प्रशासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार हॉकर्सच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, या हॉकर्सच्या कुटुंबांवर मोठ्या आर्थिक संकटाचा डोंगर कोसळण्याची भीती आहे. अध्यक्ष नंदू वसंत पाटील, सचिव सचिन जोशी, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, पथविक्रेता समितीचे सदस्य मोहन तिवारी, गोविंदा कुंभार, समाधान पाटील, रवी चौधरी, भूषण कोळी, सादिक मणियार, भैया चौधरी, कन्हैया गवळी, बबलू चौधरी, गोपी सोनार, भूषण सोनवणे, शिवम राजपूत, सचिन माळी, संदेश अलई, अनिस मणियार, गणेश जाधव, हरीश काळे, लक्ष्मण शिंदे, टेलर नाना,बापू चौधरी, पिंटू शिंदे, बापू कोळी आदी हॉकर्स बांधव निवेदन देताना उपस्थित होते.


Protected Content

Play sound