अनधिकृत वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0b8d4b0b 6f44 4d23 91f4 e9be2c343311

 

जळगाव (प्रतिनिधी) रस्ते सुरक्षेत कुठलीही तडजोड न करता प्रादेशिक परिवहन विभागाने एक धडक मोहिम उभारून सर्व वाहनांची सखोल तपासणी करावी. तपासणी मोहिमेत आढळून आलेल्या अनधिकृत वाहनांचे परवाने तात्काळ रद्द करावेत. अशा मोहिमेत सातत्याने राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या.

 

आज त्यांच्या दालनात जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी परिवहन, पोलीस आणि सर्व संबंधित विभागांना सुचना केल्यात. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, नहीचे अधिकारी श्री. सी.एम.सिन्हा, हितेश अग्रवाल, डॉ.डी.एस.देवांग, सा.बां.विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता विलास पाटील, विद्युत मंडळाचे एस.एस.साळुंखे, मनपाचे अतिक्रमण विभागाचे एच.एन.खान आदि अधिकारी उपस्थित होते.

रस्ते सुरक्षेचा विचार करताना जसे रस्त्यांवर चालविले जाणारे वाहन हे सुस्थितीत असावे, वाहन चालक हा चांगला चालक असावा, वाहनाची वेळोवेळी उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून तांत्रिक तपासणी झालेली आहे किंवा नाही, अशा अपेक्षा करीत असतानाच ती चालविली जातात ते महामार्ग, राज्यमार्ग, उपरस्ते शहरी किंवा ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते रहदारीस योग्य असले पाहिजेत. रस्त्यांवरील खड्डे वेळीच योग्यरितीने बुजविल्यास रस्ते अपघात कमी करता येतील.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी शहरातील अनधिकृत गतीरोधकांची तात्काळ पाहणी करून ती काढून टाकण्याच्या सूचना महानगरपालिकेचे अभियंता श्री.भोळे यांना केल्या. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गालगत असलेली रहिवासी, दुकाने किंवा आठवडे बाजाराच्या निमित्ताने होत असलेली अतिक्रमणे, रस्त्यात वाहने उभी करणे असे प्रकार सर्व संबंधितांनी पोलीसांची मदत घेवून थांबवावेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघातग्रतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळण्यास किंवा मिळवून देण्यात अनेकवेळा अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी गतवर्षाच्या तुलनेत अपघातात तब्बल 15 टक्यांनी झालेल्या वाढीबाबत चिंता व्यक्त करून यावर सर्वांनी सर्वसमावेशक चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या वाढलेल्या अपघातांच्या प्रमाणाला नादुरूस्त वाहने, बेशिस्त वाहन चालविण्यांऱ्या बरोबरच खराब रस्ते किंवा त्यावर पडलेले खड्डेही कारणीभूत असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून देवून चिंता व्यक्त केली.

रस्ते अपघात आणि रस्ते सुरक्षेमध्ये कुठलीही तडजोड न करता अपघात विरहित जिल्हा करण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचना शेवटी सर्व उपस्थितांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्यात.

Protected Content