फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील श्रीराम टॉकीज परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत १ लाख ७ हजार रूपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, फैजपूर शहरातील श्रीराम टॉकीज परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भुसावळ येथील निरिक्षक ई. ना. वाघ यांना मिळाली होती. या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त अ.ना. ओहोळ व जिल्हा अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने श्रीराम टॉकीज परिसरात छापा मारला असता येथे देशी विदेशी अवैध मद्यसाठा मोठ्या प्रमाणात आढळून आला. यात टँगो पंच, देशी दारू बॉबी संत्रा, मॅकडॉल व्हिस्की, रॉयल नाईट माल्ट व्हिस्की आदींचा मद्य साठा आढळून आला. याचे अंदाजे मूल्य १ लाख ७ हजार इतके असून याला जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधीत अवैध मद्यसाठ्याचा मालक विकी प्रकाश आठवाणी (रा. फैजपूर) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भुसावळ येथील निरिक्षक ई.ना. वाघ हे करीत आहेत.